मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण
यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल
जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) उद्योग व व्यापार आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा हा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून राजकीय वर्तुळात परिचित असलेले हर्षवर्धन खैरनार हे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणातून बाजूला होते. परंतु, आता त्यांनी पुनरागमन करत भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विकासाभिमुख राजकारणात हातभार लावण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युवक, सामाजिक तसेच संघटनात्मक क्षेत्रात काम करून खैरनार यांनी उत्तर महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या पक्षांतरामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन खैरनार हे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना विस्तार, युवकांचे सक्षमीकरण तसेच विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या अनेक समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.







