जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील आभोडा (बु.) येथे बेकायदेशीरपणे गोवंश हत्या करून मांसाची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ६०० किलो गोमांस, हत्त्यारे आणि तीन जिवंत गोवंश असा एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आभोडा येथील बस स्टँड परिसरात आणि चावडी भागात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व त्यांच्या पथकाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दोन्ही ठिकाणी धाडी टाकल्या. बस स्टँड परिसरातील राहत्या घरात गोमांस कापत असताना आरोपी उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा बु.) याला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. तर चावडी भागातील दुसऱ्या कारवाईदरम्यान संशयित आरोपी इरफान रहेमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा पोलिसांना पाहून गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झाला.
जप्त केलेला माल आणि गोमांसाची विल्हेवाटदोन्ही ठिकाणांवरून अनुक्रमे ६०,००० रुपये किमतीचे ३००-३०० किलो (एकूण ६०० किलो) गोमांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले. रावेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या समक्ष मांसाचे नमुने घेऊन उर्वरित मांसाची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात आली. तसेच आठवडे बाजार परिसरात कत्तलीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या बांधून ठेवलेल्या २७,००० रुपये किमतीच्या ३ जिवंत गायींची पोलिसांनी सुटका करून त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे.
अनेक कलमांन्वये गुन्हा दाखलपोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.रं.नं. ३७६/२०२६) करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.उ.नि. मनोज महाजन, पोलीस अंमलदार ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, राहुल परदेशी, विकार शेख व महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मशाने यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.







