पुणे (निवासी संपादक प्रभाकर निकम) | अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात देहूरोड शहर पंचक्रोशी कृती समितीच्या वतीने येत्या ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, नागरिकांनी यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
हा महामोर्चा ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता देहूरोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू होईल. तेथून जुना मुंबई-पुणे महामार्ग, देहूरोड पोलीस चौकी (सवाना चौक), पारशीचाळ, अबुशेठ मार्ग, वृंदावन चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून महात्मा फुले मंडई व बाजारपेठेतून ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात पोहोचेल. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर निषेध सभेत होईल. त्यानंतर प्रशासनाचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी वैभव भुतेकर यांच्यामार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल.
निषेध सभेत बहुजन समाजाचे तोफ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मानव कांबळे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक ईश्वरशेठ अगरवाल आणि बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते हुलगेशभाई चलवादी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यात शहीद झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता होईल.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम ३४०, ३४१ व ३४२ अन्वये बहुजन समाजाला प्रगतीची संधी दिली. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन राज्य सरकारने ५९ जातींचे उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला आहे. उपवर्गीकरण म्हणजे संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे उपवर्गीकरण त्वरित किंवा जनगणनेनंतरच रद्द करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
मुख्य निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अशोक अंकुशराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कृती समितीची स्थापना झाली. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी धम्मभूमी सामाजिक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, संविधान सन्मान संघ, मनसे, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम सेवा संघ, बाल्मिकी समाज आणि विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.







