जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | नूतन मराठा महाविद्यालय आणि ‘विज्ञान भारती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ (VVM) परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा भव्य सन्मान सोहळा नूतन मराठा महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते, तर आयोजन विज्ञान भारतीच्या जिल्हा समन्वयक डॉ. माधुरी पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. संगीता जगदाळे यांनी गायलेल्या विज्ञान प्रार्थनेने झाली.
या सोहळ्यात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकूण २४ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ८ शाळांचा विशेष सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान भारतीच्या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नूतन मराठा महाविद्यालयात ‘इस्रो’चे (ISRO) ऑनलाइन सेंटर उपलब्ध असून, शालेय विद्यार्थ्यांनीही त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.
VVM चे स्टेट कोऑर्डिनेटर संदीप पाटील आणि अमोल कुंभारकर यांनी LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना यापुढील परीक्षा पद्धती आणि विज्ञान क्षेत्रातील संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आयोजकांनी विज्ञान भारतीच्या विविध उपक्रमांची माहिती देत, आगामी काळातही जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग असाच वाढवत न्यावा, अशी विनंती केली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले.







