सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | खटाव तालुक्यातील गारळेवाडी येथील गरीब व पात्र ग्रामस्थांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते संतोष (बाबुराव) मारुती गारळे हे प्रशासनाविरुद्ध लढा देत आहेत. गारळेवाडी ग्रामसभेने पात्र लाभार्थ्यांची निवड करून मंजूर केलेली यादी आणि ठराव वडूज पुरवठा विभागाकडे देऊन सुमारे सहा महिने उलटले आहेत. मात्र, पुरवठा विभागाच्या चालढकलीमुळे अद्यापही लाभार्थ्यांची अंतिम निवड झालेली नाही. त्यामुळे पात्र आणि गरीब नागरिक हक्काच्या धान्यापासून वंचित असून त्यांच्यात तीव्र संतापाचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री. गंगाधर नामदेव बत्तलवाड यांच्याकडे सर्व लाभार्थ्यांची कागदपत्रे देऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. तसेच, गावातील मृत व्यक्ती, लग्न झालेल्या मुली, स्थलांतरित आणि सरकारी कर्मचारी अशी एकूण ५६ नावे अन्न सुरक्षा योजनेतून रद्द करण्यासाठी गारळेवाडी ग्रामपंचायतीने अधिकृत निवेदन दिले आहे. याशिवाय रेशन दुकानदारानेही ६० नावे रद्द करण्यासाठी निवेदन दिले आहे. ही नावे रद्द झाल्यास नवीन पात्र गरिबांना जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र, नऊ महिने होऊनही बत्तलवाड यांनी यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
वडूज पुरवठा शाखेत ‘थोरात’ आणि ‘तोडकर’ नावाच्या खाजगी व्यक्तींना बेकायदेशीरपणे नियुक्त करण्यात आले असून, हे लोक शासकीय कार्यालयात बसून सामान्य जनतेकडून कामासाठी पैशांची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. जनतेची होत असलेली ही आर्थिक लूट आणि गैरकारभाराबाबत सामाजिक कार्यकर्ते टी. आर. गारळे साहेब यांनी सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वैशाली राजमाने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली. मात्र, त्यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी “टार्गेट (स्टाँप) शिल्लक नाही” असे मोघम उत्तर देऊन या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक केली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
लोकप्रतिनिधींचा संपर्क, तरीही प्रशासन सुस्त!
“ग्रामसभेने मंजुरी देऊनही पुरवठा विभागाकडून यादीला अंतिम मान्यता मिळालेली नाही. परिणामी अनेक पात्र कुटुंबे धान्यापासून वंचित आहेत. या संदर्भात मायणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ॲड. सूरज पाटील आणि खटावच्या तहसीलदार बाई सर्जेराव माने यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे कोणताही मार्ग निघालेला नाही. कलेढोण परिसरातून तातडीने रेशनिंग सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.”
— ग्रामस्थ व लाभार्थी, गारळेवाडी (कलेढोण).
ग्रामस्थांनी या प्रलंबित कामाबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी कु. अनु दीपक जगताप यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, “बत्तलवाड यांना भेटा” असे सांगून त्या नेहमी जबाबदारी झटकतात. सर्वात महत्त्वाचा आणि संतापजनक मुद्दा म्हणजे, जगताप मॅडम ऑफिसच्या वेळेत शासकीय कामाऐवजी तासन् तास स्वतःच्या मोबाईलवर व्यस्त असतात. त्यांचे फोनवरचे वैयक्तिक संभाषण पूर्ण होईपर्यंत दूरवरून आलेल्या गरीब ग्रामस्थांना कार्यालयाबाहेर ताटकळत उभे राहावे लागते, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
संबंधित प्रशासनाने वडूज पुरवठा विभागातील या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभाराची तातडीने दखल घेऊन प्रलंबित लाभार्थी निवड प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी गारळेवाडी व कलेढोण परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पुरवठा विभागाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष गारळे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.







