ठाणे गुन्हे शाखेची कारवाई : जबरी चोरी आणि बसमधील प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा गँगचा पर्दाफाश

ठाणे गुन्हे शाखेची

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जबरी चोरी आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद मांडला होता. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने अहोरात्र प्रयत्न करून एका सराईत आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांसह बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या दोन महिला आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ५२ लाख ३४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील एकूण २४ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ५२,३४,१००/- रुपये किमतीचे एकूण ३२ तोळे सोन्याचे दागिने. गुन्ह्यात वापरलेल्या ५ मोटरसायकल. अग्निशस्त्र (पिस्तूल), १ जिवंत काडतूस आणि १ धारदार चाकू मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये सउद सिराज खान उर्फ सउद काल्या (वय २५, रा. देवरीपाडा, कौसा, मुंब्रा) आणि स्वप्नील हरीष माधवानी उर्फ बाबू खरखटया (वय २०, रा. शांती मफतलाल झोपडपट्टी, कळवा पूर्व) यांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी सउद काल्या याच्याविरुद्ध यापूर्वी ‘एम.पी.डी.ए.’ (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार असल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध ‘प्रोक्लेमेशन ऑर्डर’ (फरार घोषित करण्याचा आदेश) काढली होती. गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने त्याला शोधून काढले. या दोघांकडून कळवा, चितळसर, नारपोली, नौपाडा, रबाळे, टिळकनगर, मुंब्रा, वडगाव मावळ आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यांमधील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

एस.टी. आणि इतर बसेसमध्ये प्रवास करताना महिला प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला गुन्हेगारांनाही पोलिसांनी मुलुंड (मुंबई) येथून अटक केली आहे. अटक केलेल्या महिला आरोपींमध्ये संगीता दशरथ पीठकर (वय ४५, रा. दत्तकृपा सोसायटी, वडारवाडा, मुलुंड पश्चिम; मूळ रा. रामनगर, सोलापूर) आणि सुरेखा बजरंग गायकवाड (वय ४७, रा. परशुराम चाळ, गवाण पाडा, मुलुंड पश्चिम; मूळ रा. रामनगर, सोलापूर) यांचा समावेश आहे. या महिला टोळीकडून कळवा, ठाणे नगर, राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची धडाकेबाज कामगिरी ठाणे शहराचे पोलीस सह-आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शाखा घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, पोलीस हवालदार अविनाश पाटील, संदीप महाडिक, धनंजय आहेर, मुकुंद आव्हाड, नंदकुमार पाटील, पोलीस शिपाई अमोल ढावरे, प्रशांत लवटे, सागर सुरळकर, चालक पोलीस हवालदार शशिकांत सावंत, महिला पोलीस हवालदार मलिका बहीरम आणि दिपाली जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here