सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | एस.टी. बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील एका सराईत महिला चोराला जेरबंद करण्यात सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. विटा बसस्थानकावर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावत पोलिसांनी कोल्हापूरच्या महिला चोराला अटक केली असून, तिच्याकडून ६ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक सांगली विभागात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ) अरुण पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ) सुरज थोरात यांना विश्वासू बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित महिला आष्टा बसस्थानक परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी आष्टा बसस्थानक परिसरात सापळा रचून निगराणी सुरू केली. यादरम्यान एक महिला घाईघाईने बसस्थानकाबाहेर पडताना दिसली. पोलिसांना तिचा संशय आल्याने, महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांच्या मदतीने पथकाने तिला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने तिचे नाव कविता सतीश काळे (वय ४६ वर्षे, रा. कनान नगर झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे सांगितले. महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांनी पंचांसमक्ष तिची अंगझडती घेतली असता, तिच्या जवळील पर्समध्ये एका कागदी पुडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली.
या दागिन्यांबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने दोन महिन्यांपूर्वी (७ एप्रिल २०२६ रोजी) विटा एस.टी. स्टँडवर एका महिलेची पर्समधून हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विटा पोलीस ठाण्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता, या चोरीबाबत शीतल रवींद्रकुमार जाधव (रा. हातनूर, ता. तासगाव) यांनी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असल्याची खात्री पटली.
पोलिसांनी आरोपी कविता काळे हिच्याकडून सोन्याचे दागिने (गठण आणि बांगड्या): किंमत ६,९०,०००/- रुपये, रोख रक्कम: ५००/- रुपये (भारतीय चलनी नोटा), असा ६,९०,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सपना गराडे, पोहेकॉ अरुण पाटील, संदीप गुरव, उदयसिंह माळी, मच्छिंद्र बर्डे, पोशि सुरज थोरात आणि विनायक सुतार यांच्या पथकाने केली.
अटक करण्यात आलेली महिला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ उत्तम माळी करत आहेत.







