बकरींसाठी चारा तोडताना ९ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू; आजीच्या डोळ्यांदेखत नातवाने सोडले प्राण

विजेच्या धक्क्याने

भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर अमीन पिंजारी) | बकरींसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ९ वर्षीय चिमुकल्याचा उच्चदाब वीजवाहिनीचा (High Voltage Wire) स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना भडगाव तालुक्यातील कोठली येथे घडली आहे. पोटच्या नातवाचा आपल्याच डोळ्यांदेखत वीज लागून मृत्यू झाल्याने आजीने एकच आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कोठली गावावर शोककळा पसरली आहे. कुणाल विलास भिल (वय ९, रा. कोठली, ता. भडगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, शनिवार (दि. ७) रोजी दुपारी ४:४० वाजेच्या सुमारास कुणाल हा आपल्या आजी हिराबाई भिल यांच्यासोबत शिवारात बकरींसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. चारा मिळवण्यासाठी तो शेतातील एका सुबाभूळच्या झाडावर चढला. मात्र, दुर्दैवाने या झाडाच्या अगदी जवळूनच महावितरणची उच्चदाब वीजवाहिनी गेली होती. झाडावर चारा तोडत असताना कुणालचा स्पर्श अचानक या जिवंत वीजवाहिनीला झाला. विजेचा तीव्र आणि जोरदार धक्का बसल्याने कुणालचा झाडावरच जागीच मृत्यू झाला.

नातवाला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच आजी हिराबाई यांनी मदतीसाठी प्रचंड आक्रोश केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी कुणालला खाली उतरवून तात्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात कुणालवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत कुणाल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तो कोठली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होता. नुकतीच दुसरीची परीक्षा उत्तीर्ण होऊन तो नव्या शैक्षणिक वर्षात तिसरीच्या वर्गात जाणार होता. नव्या वर्षाची तयारी सुरू असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला.

या प्रकरणी भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शेतशिवारातून जाणाऱ्या धोकादायक आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांबाबत महावितरणने तातडीने सुरक्षिततेचे उपाय राबवावेत, अशी संतप्त मागणी आता कोठली गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here