पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) | येत्या २७ तारखेला असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरात कुठेही गोवंश कत्तल होऊ नये, यासाठी पारोळा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, या आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ग्रुप पारोळा यांच्या वतीने पारोळा पोलिसांना देण्यात आले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने गोवंशाची अवैध कत्तल होण्याची भीती व्यक्त करत गोरक्षकांनी पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बजरंग दलाने स्पष्ट केले आहे की, बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर गोवंश जमा करण्यात आलेला आहे. हा गोवंश एका विशिष्ट समाजाकडून हुडकून काढून तो तात्काळ जप्त करावा आणि या मुक्या प्राण्यांना जीवदान द्यावे.
जर पोलिसांनी वेळीच योग्य ती पावले उचलली नाहीत, तर या गोवंशाची हत्या होण्याची दाट शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावरच राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस खात्याने संवेदनशील भागात तातडीने झडती सत्र राबवावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
पारोळा पोलिसांना देण्यात आलेल्या या निवेदनावर बजरंग दल प्रमुख समाधान धनगर, जयवंत चौधरी, विशाल महाजन, डॉक्टर रवींद्र धनराळे, डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, मनोज चौधरी, पंकज ठाकूर, राकेश पाटील, पंढरीनाथ पाटील (कन्हेरे), शुभम पाटील (कन्हेरे) आणि आबा पाटील (राजवड) यांच्यासह अनेक गोरक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







