श्रीरामपूर: ऐनतपूर शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो जप्त, एकाला अटक

ऐनतपूर

शिरपूर (प्रतिनिधी पवन मराठे) | तालुक्यातील ऐनतपूर गावच्या शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, २५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, भगवान थोरात आणि विशाल तनपुरे यांचे पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

पेट्रोलिंगदरम्यान पथकाला ऐनतपूर गावच्या शिवारात संशयास्पद विटकरी रंगाचा टेम्पो अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी तात्काळ टेम्पो थांबवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव आकाश नाना निकम (वय २१, रा. आटवाडी, बेलापूर, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून २०,००० रुपये किमतीची २ ब्रास अवैध वाळू, ५,००,००० रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण ५,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी आकाश निकम याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ४३५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा डायल्या ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here