शिर्डी (विशेष प्रतिनिधी तुषार महाजन) | दैनिक ‘पुण्यनगरी’ परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रतिष्ठित ‘हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी सायंकाळी शिर्डी येथील हॉटेल सेंट लॉन येथे अतिशय दिमाखदार आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि निस्वार्थ कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आदर्श मान्यवरांचा या भव्य सोहळ्यात गौरव करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठलराव पवार यांना मिळालेला विशेष सन्मान ठरला.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (IPS) श्री. कृष्णप्रकाश आणि ‘बीजमाता’ म्हणून जगभरात ख्याती असलेल्या पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते विठ्ठलराव पवार यांना मानाचा ‘हिरोज ऑफ अहिल्यानगर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विठ्ठलराव पवार यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि अथक परिश्रमाचा गौरव आहे. त्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या ‘स्वच्छता विभागात’ एक अत्यंत साधारण कर्मचारी म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. तिथून आपल्या कौशल्याच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या व वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ‘श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, शिर्डी’च्या चेअरमनपदापर्यंत मजल मारली. स्वच्छता विभागातील कर्मचारी ते संस्थेचे चेअरमन, हा त्यांचा संघर्षमय प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श मानला जात आहे.
केवळ संस्थेचा विस्तार करण्यापुरतेच मर्यादित न राहता, विठ्ठलराव पवार यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही आपले मोठे योगदान दिले आहे. कामगार वर्ग आणि तळागाळातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि निस्वार्थ तळमळीची दखल घेऊन पुण्यनगरी परिवाराने त्यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडले.
या भव्य सोहळ्याला जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक तसेच साई संस्थानचे असंख्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी, “समाजासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या आणि तळागाळातून स्वकर्तृत्वावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या अशा खऱ्या नायकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे,” अशा शब्दांत पवार यांच्या कार्याचे कौतुक केले.







