पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | प्रभाग क्र. २७ मधील राहटणी-काळेवाडी, साई सागर कॉलनी आणि वृंदावन कॉलनी (तापकीर नगर) परिसरातील २० फूट रुंदीचा नैसर्गिक नाला एका बांधकाम व्यावसायिकाने आणि नावाजलेल्या इंग्रजी शाळा व्यवस्थापनाने संगनमत करून बेकायदेशीरपणे गिळंकृत केल्याचा खळबळजनक आरोप लोकसेवक युवराज दाखले यांनी केला आहे. पावसाळा अवघ्या २० दिवसांवर आलेला असताना हे अतिक्रमण न हटवल्यास संपूर्ण परिसर महापुरात बुडून मोठी जीवितहानी होईल, असा इशारा देत दाखले यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले आहे.
या गंभीर समस्येवर बोलताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “साई सागर कॉलनी आणि वृंदावन कॉलनी परिसरातील मूळ २० फूट रुंदीचा नैसर्गिक नाला बिल्डरने मुरूम-दगड टाकून पूर्णपणे बुजवला व त्यावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. तसेच, येथील एका इंग्रजी शाळेने नाल्याची दिशाच बदलून त्यावर संरक्षक भिंत आणि पत्रा शेड उभारले आहे. यामुळे कधीकाळी २० फुटांचा असलेला हा नाला आता फक्त ४ ते ५ फूट शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी याच मानवनिर्मित संकटामुळे शेकडो घरांत पाणी शिरून नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले होते. हे अतिक्रमण म्हणजे स्थानिक नागरिकांच्या जिवाशी चाललेला थेट खेळ आहे.”
हा प्रकार महापालिका अधिनियम १९४९ चे कलम २२९, २३१ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चा स्पष्ट भंग असल्याचे दाखले यांनी नमूद केले. “मा. मुंबई उच्च न्यायालयाचे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे कडक आदेश असतानाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) अतिक्रमण विभाग अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत झोपा काढत आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय आहे,” असा थेट घणाघात युवराज दाखले यांनी केला.
या संदर्भात शिवशाही शासनाच्या वतीने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात आगामी ७ दिवसांत भूमापकामार्फत नाल्याची मोजणी करून तात्काळ बुलडोझर लावून सर्व अवैध अतिक्रमणे पाडण्यात यावीत, संबंधित बिल्डर, शाळा व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी PCMC अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, नाला पूर्ववत मूळ स्थितीत आणून त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधावी व परिसरात CCTV कॅमेरे बसवावेत, पावसाळ्यापूर्वी ही कारवाई न झाल्यास आणि नागरिकांचे नुकसान झाल्यास थेट मनपा आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
“प्रशासनाने येत्या ८ दिवसांत या नाल्यावरील अतिक्रमण हटवले नाही, तर कायदा हातात घेण्याची आमची इच्छा नाही, परंतु नागरिकांच्या रक्षणासाठी आम्ही स्वतः ‘शिवशाही शासन’ स्टाईलने हातोडा घेऊन हे अतिक्रमण पाडल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बिल्डर आणि शाळा माफियांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही,” असा सज्जड इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.







