विट्यात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका; ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसांसह २१ वर्षीय तरूणाला अटक

पिस्टल

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडक) | जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. विटा ते तासगाव रस्त्यावरील ‘श्री मंगल कार्यालय’ परिसरात बेकायदेशीररित्या पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ देशी बनावटीचे पिस्टल, ४ जिवंत काडतुसे (राऊंड) आणि एक मोटारसायकल असा एकूण २,६७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक विशेष मोहीम राबवत होते.

या दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार सूर्यकांत साळुंखे, संजय पाटील, सुनील जाधव आणि अभिजीत ठाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. विटा ते तासगाव रस्त्यावरील श्री मंगल कार्यालय परिसरात एक तरुण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सदर परिसरात सापळा रचून पाळत ठेवली.

सापळा रचलेला असताना पोलिसांना बातमीतील वर्णनाचा एक तरुण मोटारसायकलजवळ पाठीला सॅक अडकवून थांबलेला दिसला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता वेढा घालून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव धीरज सतीश चव्हाण (वय २१ वर्षे, रा. पारे रोड, बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये ४ देशी बनावटीचे पिस्टल आणि पॅन्टच्या खिशात ४ जिवंत काडतुसे आढळून आली. शस्त्र बाळगण्याबाबत अधिकृत परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपी धीरज चव्हाण याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ही शस्त्रे त्याने ‘पाजी’ (पूर्ण नाव माहित नाही, रा. सेंधवा, राज्य – मध्यप्रदेश) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. ही शस्त्रे तो सांगली जिल्ह्यात जादा दराने विक्री करण्यासाठी घेऊन आला होता. त्याच्याजवळून २,४००००/- रुपये किमतीचे ०४ देशी बनावटीचे पिस्टल, २,०००/- रुपये किमतीचे ०४ जिवंत काडतुसे (राऊंड), २५,०००/- रुपये किमतीची बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल (काळी रंग), ४००/- रुपये किमतीची सॅक असा एकूण २,६७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ सूर्यकांत यशवंत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म ऍक्ट) कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २१२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस करत आहेत.

सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही अशीच कडक आणि प्रभावी कारवाईची मोहीम सातत्याने चालू ठेवली जाईल, असा इशारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here