नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | गरजू शेतकऱ्यांना वेठीस धरून लाचेची मागणी करणाऱ्या महसूल विभागातील एका भ्रष्ट तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना देवळा येथे घडली आहे. सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करून नवीन सातबारा देण्यासाठी लाच घेताना देवळा तालुक्यातील खामखेडा सजेचा तलाठी पप्पू काशिनाथ सोनकांबळे आणि त्याच्या खाजगी हस्तकाला नाशिक परिक्षेत्राच्या एसीबी पथकाने रिक्षेच्या रसवंती गृहाजवळ सापळा रचून अटक केली.
कारवाईनंतर शासकीय वाहनात बसत असताना लाचखोर तलाठ्याने लाचेचे पैसे खिशातून काढून रस्त्यावर फेकत पुरावा नष्ट करण्याचा आणि आरडाओरडा (टाहो) करत सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, एसीबीच्या सतर्क पथकाने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईमुळे देवळा तालुक्यातील महसूल यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अटक पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६) – गाव तलाठी कामगार, सजा खामखेडा, ता. देवळा. प्रशांत दावल सोनवणे (वय २४, रा. खामखेडा) – खाजगी इसम (लाचेसाठी प्रोत्साहन देणारा) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई टीव्हीएस मोटारसायकल शोरूमसमोर, वाजगाव रोड, देवळा-कळवण रस्ता, देवळा येथील एका रसवंती गृहाचा मंडप येथे करण्यात आली.
खामखेडा येथील एका तक्रारदार शेतकऱ्याला त्याच्या ७/१२ उताऱ्यावरील नाव कमी करून नवीन सातबारा उतारा हवा होता. हे शासकीय काम करून देण्यासाठी तलाठी पप्पू सोनकांबळे याने तब्बल ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १,००० रुपये आरोपी कांबळे याने आधीच स्वीकारले होते. उर्वरित ५,००० रुपयांची रक्कम स्वीकारण्यासाठी कांबळे याने शेतकऱ्याला देवळा येथील वाजगाव रस्त्यावरील रसवंती गृहात बोलावले होते.
शेतकऱ्याने या संदर्भात आधीच नाशिक एसीबी पथकाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, शुक्रवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी सायंकाळी एसीबीच्या पथकाने रसवंती गृहाच्या मंडपात सापळा रचला. तक्रारदार शेतकऱ्याकडून उर्वरित ५,००० रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना तलाठी सोनकांबळे आणि त्याला प्रोत्साहन देणारा खाजगी इसम प्रशांत सोनवणे या दोघांना एसीबीने रंगेहात दस्तऐवज केले.
एसीबी पथकाने ताब्यात घेतल्यानंतर आरोपी तलाठी कांबळे याला शासकीय वाहनात बसवले जात होते. त्यावेळी त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खिशातून लाचेच्या नोटा काढून थेट गाडीबाहेर रस्त्यावर फेकून दिल्या आणि मोठा टाहो फोडला. मात्र, अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या नोटा जप्त करत त्याचा हा डाव उलटवून लावला. शुक्रवार रात्री उशिरापर्यंत या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महसूल विभागातील वाढत्या भ्रष्टाचाराला कंटाळून थेट लाचलुचपत विभागाकडे दाद मागणाऱ्या खामखेडा येथील तक्रारदार शेतकऱ्याच्या आणि नाशिक परिक्षेत्राच्या एसीबी पथकाच्या या धाडसी कामगिरीचे देवळा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.







