कोल्हापुरात आयपीएल ‘फॅन पार्क’मध्ये नियमांचे उल्लंघन; पोलिसांनी जप्त केल्या लेझर लाईट्स, आयोजकांसह दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापुरात

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे कसबा बावडा येथील मेरी वेदर मैदानावर आयोजित आयपीएल ‘फॅन पार्क २०२६’ कार्यक्रमात प्रशासकीय नियमांचे उघड उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात परवानगीच्या अटी धाब्यावर बसवून अतितीव्र लेझर लाईट्सचा वापर केल्याने शाहूपुरी पोलिसांनी या सर्व लाईट्स जप्त केल्या असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक मदन शेळके (रा. कोल्हापूर) आणि लाईट मालक विजयराज बपनपल्ली (रा. हुबळी-धारवाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आयपीएल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी २३ आणि २४ मे २०२६ रोजी या फॅन पार्कचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आयोजकांनी प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, २३ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या पथकाने मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तिथे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. आयोजकांनी परवानगीतील अटी मोडून मैदानावर अतिशय प्रखर आणि डोळ्यांना गंभीर त्रासदायक ठरणाऱ्या ‘शार्पी’ व ‘बीम’ लाईट्सचा वापर सुरू केला होता.

या प्रखर लेझर दिव्यांच्या सततच्या फ्लॅशिंगमुळे परिसरात राहणारे नागरिक, मॅच पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तीव्र प्रकाशाने वाहनचालकांचे डोळे दिपून कसबा बावडा परिसरात अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. तसेच, या गोंधळामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तातडीने संबंधित आयोजक आणि लाईट व्यवस्थापन करणाऱ्यांना हे प्रखर दिवे बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आयोजकांनी पोलिसांच्या या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लेझर लाईट्सचा वापर सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत मैदानावर वापरण्यात येत असलेल्या सर्व ‘Sharpy/Beam’ लाईट्स जप्त करून आपल्या ताब्यात घेतल्या.

या बेजबाबदारपणाबद्दल दोन्ही आरोपींविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३८२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि २७० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here