शिर्डी (प्रतिनिधी) | श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटलच्या सेवानिवृत्त कर्मचारी आणि शिर्डी येथील दर्शन लाईन प्रमुख श्री. प्रवीण मिरजकर यांच्या मातोश्री श्रीमती किरणबाई मिरजकर यांचा वाढदिवस नुकताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित छोटेखानी सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीमती किरणबाई मिरजकर यांनी संस्थान हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे बजावली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिर्डीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते, माजी सरपंच दिगंबर शिवराम कोते, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आसारामजी वारे, त्यांचे सुपुत्र तथा दर्शन लाईन प्रमुख प्रवीण मिरजकर आणि पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा दांडगा उत्साह पाहून उपस्थित सर्वच मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. तसेच श्रीमती किरणबाई मिरजकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांचे पुढील आयुष्य उत्तम आरोग्य लाभलेले, दीर्घायुषी आणि सुख-समृद्धीचे जावो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मिरजकर परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.







