जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (GMC) स्वच्छता व इतर दैनंदिन कामांचे कंत्राट घेतलेल्या ‘स्मार्ट’ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपनीने मागील तीन ते चार दिवसांपासून ‘साई मल्टी सर्व्हिसेस’चे काम बंद पाडल्यामुळे जवळपास ६० ते ८० कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि रुग्णालयात तातडीने ‘न्यूरोसर्जन’ची नियुक्ती करण्यात यावी, या मागण्यांसाठी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी अधिष्ठात्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माजी नगरसेवक अशोक एस. लाडवंजारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजीपणामुळे रुग्णालयाची स्वच्छता वेळेवर होत नाहीये. त्यातच गेल्या ३-४ दिवसांपासून ६० ते ८० कामगारांचे काम बंद केल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेची व इतर महत्त्वाची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. परिणामी, रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित कंपनीने सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना कामाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रकमा वसूल केल्याचा गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात रुग्णालयात अहोरात्र सेवा दिली, अशा निष्ठावंत कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे.
तीन मंत्रीपदे असूनही जिल्हा रुग्णालयात ‘न्यूरोसर्जन’ नाही!
जळगाव जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल तीन मंत्रीपदे मिळालेली असतानाही, जिल्ह्यातील एकमेव मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापपर्यंत ‘डॉ. न्यूरोसर्जन’ यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. रुग्णालयात तात्काळ न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कमी केलेल्या ‘साई मल्टी सर्व्हिसेस’च्या ६० ते ८० कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करून त्यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी लाडवंजारी यांनी केली आहे. जर या कामगारांना न्याय मिळाला नाही, तर ते आपल्या लहान मुलाबाळांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (डीन) यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसतील, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन देताना माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्यासह माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आणि माजी नगरसेवक सुनील माळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक पावले न उचलल्यास जळगावात मोठे आंदोलन उभे राहील, असे या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.







