उदय चौकात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १ पिस्टल व २ जिवंत काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड

पिस्टल

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | सांगली जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपली कडक मोहीम सुरूच ठेवली आहे. २४ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ईश्वरपूर येथील उदय चौक परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका २६ वर्षीय रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली. त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे (राऊंड) असा एकूण ५१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांचे पथक विशेष मोहीम राबवत असताना पथकातील पोहेकॉ अरुण पाटील आणि पोशि सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. ईश्वरपूरमधील उदय चौक परिसरात एक निळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण अवैध अग्निशस्त्र घेऊन थांबला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिंग रोडवरील उदय चौक परिसरात तात्काळ निगराणी सुरू केली. सापळा रचलेला असताना पोलिसांना बातमीतील वर्णनाचा एक तरुण निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून थांबलेला दिसला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता वेढा घालून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अबुबकर हरुणरशीद मणेर (वय २६ वर्षे, रा. मणेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे असल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, अबुबकर मणेर याच्या कंबरेला डाव्या बाजूला पॅन्टमध्ये १ देशी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळून आले. पोलिसांमार्फत सदर पिस्टल तपासले असता त्याच्या मॅगझीनमध्ये २ जिवंत काडतुसे आढळून आली. अग्निशस्त्र बाळगण्याबाबत अधिकृत परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले.

पोलिसांनी आरोपी अबुबकर मणेर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हे पिस्टल त्याने त्याचा ओळखीचा साथीदार साबिर पुणेकर (रा. अकबर मोहल्ला, ईश्वरपूर) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.  त्याच्याजवळून ५०,०००/- रुपये किमतीचे ०१ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र), १,०००/- रुपये किमतीचे ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकारणी पोहेकॉ अरुण जालिंदर पाटील यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म ऍक्ट) कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २०३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत.

सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे बाळगणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाईची ही मोहीम यापुढेही अशीच कडकपणे चालू ठेवण्यात येईल, असा सज्जड इशारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here