वरुड गावात वानरांचा धुमाकूळ; वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे खटावमधील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा

वानरांचा धुमाकूळ

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | तालुक्यातील वरुड गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वानरांचा उच्छाद अखेर वन विभागाच्या तत्परतेमुळे थांबला आहे. वानरांच्या टोळीने शेतातील पिकांसह आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान केले होते. तसेच घरांवरील कौले फोडणे आणि महिलांवर हल्ला करण्याच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, वन विभागाने तात्काळ मोहीम राबवून या वानरांना जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

वरुड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या धुमाकुळाने शेतकरी वर्ग हवालदील झाला होता. हाता तोंडाशी आलेली पिके आणि आंब्याच्या बागांची वानरांकडून मोठ्या प्रमाणावर हानी केली जात होती. त्यातच घरांवर उड्या मारून कौले फोडल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत होते. काही ठिकाणी महिलांवरही वानरांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्यामुळे गावात घराबाहेर पडणे कठीण झाले होते.

या गंभीर परिस्थितीची माहिती पत्रकार लालासाहेब माने पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी आटपाडकर साहेब यांना दिली. माहिती मिळताच आटपाडकर साहेब यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने दखल घेतली. शासनाच्या नवीन नियमांनुसार, आटपाडकर साहेब यांच्या थेट मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या विशेष पथकाने वरुड गावात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि वानरांना पकडण्याचे नियोजन केले.

वानर पकडण्यात माहीर असलेले समाधान गिरी व संदीप गिरी यांच्या विशेष पथकाने गावात तातडीने पिंजरा लावला. अत्यंत शिताफीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने या पथकाने वानरांना पिंजऱ्यात जेरबंद केले. या मोहिमेदरम्यान वरुडमधील ग्रामस्थांनीही पिंजरा लावणे, वानरांसाठी खाद्य गोळा करणे यासाठी वन विभागाच्या टीमला उत्साहाने सहकार्य केले. पकडलेल्या वानरांना नंतर सुरक्षित स्थळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

वन विभागाच्या या गतिमान कारवाईमुळे गावातील पुढील मोठा अनर्थ आणि पिकांचे होणारे नुकसान टळले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले की, “वन विभागाने योग्य वेळी आणि तातडीने मदत केल्यामुळे आमच्या शेतातील पिके, आंब्याच्या बागा तसेच घरांचे होणारे नुकसान वाचले आहे. अन्यथा आम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असते.”

कारवाई यशस्वी केल्याबद्दल वरुड ग्रामस्थांनी वन अधिकारी आटपाडकर साहेब, समाधान गिरी, संदीप गिरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानून त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले. भविष्यातही प्रशासनाकडून असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here