नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | राज्यात दुष्काळात होरपळून निघालेल्या बळीराज्याला दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर ई-पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनुदान प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होईल, याची प्रतीक्षा शेतकरी करत असतानाच, सध्या पंचनाम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ‘ई-पिक पाहणी’साठी सादर केलेले कागदपत्रे ग्राह्य न धरता आता नव्याने संपूर्ण गावाची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
ग्रामविकासाची आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास अधिकारी आता आपली कार्यालये सोडून थेट शेतशिवाारात पंचनामे करण्यासाठी रानोमाळ फिरताना दिसत आहेत. विठेवाडी व झिरे पिंपळ शिवारात मागील काही दिवसांपासून विठेवाडीचे ग्रामविकास अधिकारी श्री. योगेश सूर्यवंशी हे अत्यंत सक्रिय झाले आहेत. त्यांनी थेट विठेवाडी येथील गट नंबर ४०३ च्या बांधावर जाऊन ही पंचनामा प्रक्रिया पार पाडली. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी कुबेर जाधव व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासन अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याच्या कामात व्यस्त असले, तरी वारंवार बदलणारे नियम आणि कागदपत्रांची जुवाजुव करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अगोदरच दुष्काळामुळे आर्थिक संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांना आता पंचनाम्यासाठी पायपीट करावी लागत आहे. प्रत्यक्ष अनुदानाची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत हा त्रास आणखी किती वाढणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रशासनाने कागदपत्रांची किचकट प्रक्रिया सुटसुटीत करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यातानुदान जमा करावे, अशी मागणी जोर धरत आहे.







