पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद) | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात प्रॉपर्टी आणि घराच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दीपक प्रकाश कानडे (वय ४०, रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर मुख्य संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी संतोष हरलाल कानडे (वय ५५, रा. हिंद ऑईल मिलजवळ, पाचोरा) आणि त्याच्या सख्ख्या भावामध्ये घराच्या आर्थिक व्यवहारावरून व प्रॉपर्टीवरून गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाद सुरू होते. या कौटुंबिक वादात भावाचा मेहुणा (शालक) दीपक कानडे हा मध्यस्थी करत असल्यामुळे संतोष आणि दीपक यांच्यातही सतत खटके उडत होते आणि शाब्दिक चकमक होत असे.
८ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ संतोष कानडे आणि दीपक कानडे हे आमनेसामने आले. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा जुन्या आर्थिक व्यवहारावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात संतोष कानडे याने आपल्याजवळील चाकू काढून दीपक यांच्यावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्याच्या थरारक घटनेनंतर शहरात घबराट पसरली असतानाच, आरोपी संतोष कानडे हा स्वतःहून चाकू घेऊन पाचोरा पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर मयत दीपक कानडे यांच्या बहिणीने (आरोपीच्या वहिनीने) दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपी संतोष कानडे विरुद्ध खुनाचा (मर्डर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.







