धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रा. धनंजय घरटे यांची निवड; अण्णा हजारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

प्रा. धनंजय घरटे

सामोडे (प्रतिनिधी दिलीप घरटे) | जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने धुळे जिल्हाध्यक्षपदी सामोडे येथील प्रा. धनंजय घरटे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राळेगणसिद्धी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित एका विशेष दिमाखदार सोहळ्यात त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. प्रा. घरटे यांनी आजवर पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

 

५ जून २०२६ रोजी राळेगणसिद्धी येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते प्रा. धनंजय घरटे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्री. प्रमोददादा मोरे, सरकारी विधीतज्ज्ञ मा. ॲड. सुरेश लगड (मुंबई) आणि अहिल्यानगरच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, सामाजिक प्रदूषण निर्मूलन आणि यामध्ये युवकांच्या वाढत्या सहभागाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी केवळ प्रशासनावर विसंबून न राहता पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कार्य करण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याला माजी पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, पिंपळनेरच्या महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेचे संचालक मिलिंद महाजन, शिक्षक प्रबोधिनीचे सचिव उमेश घरटे, आबा माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रा. धनंजय घरटे यांची नियुक्ती झाल्याने आगामी काळात धुळे जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि प्रदूषणमुक्त समाजनिर्मितीच्या मोहिमेला अधिक गती व प्रभावी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल धुळे व साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here