बुलडाणा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन जगदाळे) | येणाऱ्या खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते व विविध प्रकारच्या बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदुरा तालुका अध्यक्ष दीपक सुधाकरराव सावे यांनी केली आहे.शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात खत आणि बियाण्यांसाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
या संदर्भात तालुकाध्यक्ष दीपक सावे यांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना रीतसर निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात प्रामुख्याने कृषी केंद्रांवर साठा उपलब्ध करा: खरीप हंगामात शेतकऱ्यांना दरवर्षी खत व बियाण्यांच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. हा अनुभव लक्षात घेता, तालुक्यातील सर्व अधिकृत कृषी केंद्रांवर आवश्यक प्रमाणात रासायनिक खते व बियाण्यांचा साठा आधीच उपलब्ध करून ठेवावा. वेळेत वाटप सुनिश्चित करा: बळीराजाला त्याच्या गरजेनुसार आणि वेळेत या निविष्ठांचे वाटप केले जाईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. कृषी विभागाला आदेश द्या: पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होऊ नये आणि तुटवड्यामुळे शेतीचे नुकसान टाळता यावे, यासाठी कृषी विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक व कडक सूचना द्याव्यात. या मागण्या करण्यात आल्या आहेत.
“खरीप हंगाम हा आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. ऐन पेरणीच्या तोंडावर खते-बियाण्यांचा तुटवडा किंवा काळाबाजार झाल्यास शेतकरी संकटात सापडेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून तालुक्यात आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा,” असे आवाहन दीपक सावे यांनी यावेळी केले.







