गडचिरोली (संपादक सुनिल पाटील) | जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत (DMF) कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून प्रशासकीय मान्यता मिळवल्याचे खळबळजनक प्रकरण गडचिरोलीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चामोर्शी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे यांना रविवारी (२८ जून) रात्री छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने आरोपीला ४ जुलैपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक लीलाधर भरडकर यांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयातील ऑपरेटर राहुल रेवाडे यांना एका प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची पीडीएफ (PDF) फाईल पाठवली व या कामांना मंजुरी मिळाली आहे का, अशी विचारणा केली. ऑपरेटरने ही बाब सहायक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. राठोड यांनी या पत्राची प्रिंट काढून जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांना दाखवली. सदर पत्र आणि त्यावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तात्काळ हे पत्र पोलीस अधीक्षकांकडे तपासासाठी पाठवले.
यानंतर सहायक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल राठोड यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३३६(३), ३३७, ३३८, ३४० आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपासात हे बनावट पत्र आशिष पिपरे यानेच पाठवल्याचे निष्पन्न झाले. आशिष पिपरे यांच्या पत्नी चामोर्शी नगरपंचायतीमध्ये भाजपच्या नगरसेविका आहेत. आशिष पिपरे हा स्वतः देखील आधी भाजपमध्ये सक्रिय होता, मात्र एका वादग्रस्त प्रकरणानंतर भाजपने त्याला दूर केले होते. त्यानंतर तो काँग्रेसच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक झाला. राजकीय पक्षा बदलला तरी पिपरे हा भाजप नेत्यांशी जवळीक साधून होता, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे करत आहेत. या कोट्यवधींच्या बनावट मान्यता घोटाळ्यात आशिष पिपरे सोडून आणखी काही बड्या व्यक्तींचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे बनावट कागदपत्रे नेमके कोणी तयार केले? मोबाईलवरून कोणाकोणाशी संपर्क साधण्यात आला? आणि यात कोणते आर्थिक व्यवहार झाले? या सर्व बाजू पोलीस तपासून पाहत असून तपासात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.







