पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | जुळे सोलापूर भागातील म्हेत्रे टॉवर जवळील एका बंद घराचे लॉक तोडून २१७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सोलापूर शहर गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. घटनास्थळी कोणताही थेट पुरावा उपलब्ध नसताना पोलिसांनी सोलापूर ते पुणे रस्त्यावरील तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून या गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीसह चोरीचे दागिने विकत घेणारे दोन हस्तक आणि पुण्याच्या एका सराफाला देखील बेड्या ठोकल्या आहेत.
जुळे सोलापूर येथील कल्याण नगर भाग-२ मध्ये राहणाऱ्या फिर्यादींचे घर (घर नं. ए-९७, ९८) दि. २५ मे २०२६ च्या रात्री बंद होते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील २१७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १,२०,००० रुपये रोख चोरून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरफोडीचा गुन्हा गंभीर असल्याने सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार आणि गुन्हे शाखेच्या पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) शैलेश खेडकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.
घटनास्थळी थेट सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. तपास पथकातील अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळापासून दूर जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली आणि एका संशयिताचा सुगावा शोधून काढला. पोलीस अंमलदार जावेद जमादार, इम्रान जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंढे, वसिम शेख आणि काशिनाथ वाघे यांच्या पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील सुमारे २५० किलोमीटर अंतरावरील ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपींची ओळख पटवली.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पुणे येथील हडपसर परिसरात सापळा रचला. दि. २० जून २०२६ रोजी मुख्य आरोपी सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३५ वर्ष, रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे) याला त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्याने त्याचा साथीदार मंजित कुमार (रा. बरवालिया, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश) याच्यासह सोलापुरात ही घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपी सुरजितसिंग टाक याने चोरीचा माल कोणाला विकला, याचा शोध घेत पोलिसांनी पुढे मोठी कारवाई केली: १. लक्ष्मण गणेश रणशिंगे (वय २७, रा. हडपसर, पुणे): चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी अटक. २. संतोष विलास साबळे (वय २९, रा. हडपसर, पुणे): चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी अटक. ३. अब्दुल वहिद अब्दुल कादर शेख (वय ४५, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. तम्मण्णा गोल्ड, रविवार पेठ, पुणे): हा सराफ व्यावसायिक असून, दागिने चोरीचे आहेत हे माहीत असतानाही ते विकत घेतल्यामुळे त्याला गुन्ह्यात मुख्य आरोपी करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी या सर्व आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १५६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण १०,६३,७५० रुपये (दहा लाख त्रेसष्ट हजार सातशे पन्नास रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोणताही पुरावा नसताना केवळ तांत्रिक विश्लेषण आणि अफाट परिश्रमाच्या जोरावर हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर पोलीस दलातून गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्वीनी पाटील, सह. पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. शैलेश खेडकर आणि त्यांच्या सायबर व गुन्हे शाखेच्या संपूर्ण अंमलदार पथकाने यशस्वी केली.







