नाशिक (उपसंपादक मिलिंद पवार) | महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना देशाच्या विद्युत क्षेत्रातील त्यांच्या गेल्या ३७ वर्षांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील मानाचा ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमरावती येथे येत्या २१ व २२ ऑगस्ट रोजी ‘आयईआय’च्या (IEI) ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनामध्ये श्री. राजेंद्र पवार यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र देखील पार पडणार आहे.
राजेंद्र पवार यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महावितरण कंपनीत (तत्कालीन मसेबो) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिथून त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मुख्य अभियंता आणि आता संचालक पदापर्यंत मजल मारली आहे.
आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी प्रामुख्याने खालील क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यांपर्यंत वीज पोहोचवणे. घरगुती, शेती, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी नवीन अद्ययावत वीज यंत्रणा उभारणे. ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देणे आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणे.
देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारी ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया’ ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे.. या संस्थेची स्थापना १९२० मध्ये झाली असून याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. सद्यस्थितीत या संस्थेची देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्रे कार्यरत आहेत.राजेंद्र पवार यांना जाहीर झालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल ऊर्जा क्षेत्रासह महावितरण परिवारातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.







