नाशिक हादरले : तपोवन रोडवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

तपोवन

नाशिक (उपसंपादक चांगदेव पवार) | पंचवटी परिसरातील तपोवन रोडवरील कृषी गो-शाळेसमोर, गोदावरी नदीपात्राच्या बाजूला असलेल्या एका निर्जन रस्त्यावर सुमारे ३० ते ३५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

अमरधामकडून तपोवनाकडे जाणाऱ्या नदीकाठच्या रस्त्यावरील संरक्षक कठड्याच्या पलीकडे एका सुटकेसमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे तिथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सुटकेस उघडून पाहिली असता त्यात महिलेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले, ज्यानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (DCP) मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) शेखर देशमुख यांच्यासह गुन्हे शाखा युनिट-१, आडगाव आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकालाही (Dog Squad) पाचारण करून रीतसर पंचनामा करण्यात आला. श्वान पथकाने संशयितांचा माग काढत पंचवटी कॉलेजकडून द्वारकेकडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा दाखवली आहे.

पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, या महिलेचा मृत्यू किमान तीन दिवसांपूर्वी झालेला असावा. महिलेची हत्या अन्य कुठल्यातरी ठिकाणी करण्यात आली असावी. मृतदेह तिथेच ठेवून दिल्यानंतर त्याला दुर्गंधी सुटल्याने, संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो सुटकेसमध्ये भरला आणि मध्यरात्रीच्या सुमारास या निर्जनस्थळी आणून टाकला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मृत महिलेच्या हातावर ‘त्रिशूळ’ आणि ‘ओम’ चे टॅटू (खूण) असून, या टॅटूच्या आधारे आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ‘मिसिंग’ (लापत्ता) तक्रारींवरून तिची ओळख पटवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here