पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद) | कुरिअर पार्सल आल्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या आणि बंदुकीच्या धाकावर कुटुंबाला ओलीस ठेवून लुटमार करणाऱ्या तीन अट्टल भामट्यांना पाचोरा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. तक्रारदार महिलेच्या घरात सोन्याच्या चिपा (तुकडे) असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने या आरोपींनी लुटीचा कट रचला होता. मात्र, पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे त्रिकूट अवघ्या काही तासांतच गजाआड झाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२, मूळ रा. सातगाव डोंगरी, ह.मु. लक्ष्मी आंगण कॉलनी, पाचोरा) या आपल्या मुलांसह घरात असताना १२ तारखेला दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. “तुमचे ॲमेझॉन कंपनीचे पार्सल आले आहे,” असे सांगून आरोपी घरात घुसले. त्यातील एका आरोपीने तक्रारदार महिलेसह त्यांच्या दोन मुलींना व मुलाला पिस्तूल दाखवून खाटेवर बसवून ठेवले. “घरातील सोन्याच्या चिपा काढून द्या, अन्यथा तुमचे काही खरे नाही,” अशी धमकी देत त्यांनी कपाटाची झडती घेतली. कपाटातील ७,००० रुपयांची रोकड आणि मुलाच्या गल्ल्यातील ७०० रुपये, असा एकूण ७,७०० रुपयांचा ऐवज लुटून आरोपी फरार झाले होते.
या खळबळजनक घटनेची नोंद पाचोरा पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सर्वप्रथम संशयित आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
चेतनने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण गुन्ह्यात त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) (वय ३७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) आणि योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) हे दोघेही सामील होते. पोलिसांनी तत्परता दाखवत या दोन्ही सहआरोपींनाही अटक केली आहे.
तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी मोकळे कुटुंबाला घाबरवण्यासाठी आणि दरोडा टाकण्यासाठी ज्या पिस्तुलाचा वापर केला होता, ते प्रत्यक्षात एक नकली पिस्तूल (पिस्टल) होते. पोलिसांनी हे नकली पिस्तूल आणि लुटलेली रोकड जप्त केली आहे. या धडक कारवाईमुळे पाचोरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, एएसआय विलास पाटील, कॉन्स्टेबल योगेश पाटील, हरीष परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी, नितीन भालेराव आदींच्या पथकाने केली.







