चोपडा पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्ट्यासह २४ वर्षीय तरुण जेरबंद

चोपडा पोलिसांची

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) | चोपडा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या उद्देशाने बेकायदेशीर शस्त्रे बाळगण्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मामलदे गाव फाट्या जवळील शनि मंदिराजवळ एक धडक कारवाई केली. या कारवाईत एका २४ वर्षीय तरुणाला गावठी पिस्तूल (कट्टा), मोटारसायकल आणि मोबाईलसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज यांना गुप्त बातमीदारामार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली होती. “चुंचाळे रोडने एक तरुण बेकायदेशीर शस्त्र घेऊन जात आहे,” अशी टीप मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी मामलदे फाट्या जवळील शनिमंदिर परिसरात दबा धरून सापळा रचला. काही वेळातच बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाची एक संशयास्पद मोटारसायकल तिथून जात असताना पोलिसांनी तिला थांबवले आणि चालकाची कसून चौकशी सुरू केली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने आपले नाव विनोद वसंतराव पावरा (वय २४, रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे स्टील बनावटीचा एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्या शस्त्राची तांत्रिक तपासणी करून ते जप्त केले.

या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून गावठी कट्टा (पिस्तूल): किंमत अंदाजे ३०,००० रुपये, काळ्या रंगाची दुचाकी: किंमत अंदाजे ४५,००० रुपये, मोबाईल फोन: किंमत अंदाजे १०,००० रुपये, असा एकूण ८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेली ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज वाळुंज, हवालदार महेंद्र साळुंखे आणि पंकज ठाकूर यांच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हे शस्त्र कुठून आणले आणि त्याचा काय उद्देश होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here