जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला अचानक आग; अग्निशमन दलाची तत्परता, अनर्थ टळला

आग

जळगाव (संपादक सुनील पाटील) |  येथील बायपास रोडवर आज सकाळी एका धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. भररस्त्यात ट्रकला आग लागल्याने काही काळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर मिळालेल्या प्रतिसादामुळे आग वेळेत आटोक्यात आली आणि एक मोठा अनर्थ टळला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.४५ वाजता बायपास रस्त्यावरून ट्रक जात असताना ही घटना घडली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन विभागाला या आगीची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा सुरू करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग वेळीच आटोक्यात आल्याने ट्रकमधील जीवितहानी किंवा इतर मोठी दुर्घटना टळली.

आग विझवण्याचे काम सुरू असताना आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे बायपासवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवून परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतर हायवेवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

ही बचाव आणि अग्निशमन मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आली. यामध्ये वाहन चालक: दीपक चौधरी व गोविंद माळी, फायरमन: भूषण पाटील, विजय पाटील, किरण पाटील, सुमित साळवे, संजय तायडे, नितीन ससाने, विकी सोनवणे आणि संदीप कोळी या सर्व जवानांनी घटनास्थळी शर्थीचे परिश्रम घेत आग विझवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here