कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांची मोठी कारवाई; मार्केट यार्ड परिसरात गांजा विकणारे दोन तरुण जेरबंद

शाहूपुरी पोलिसांची

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | शहरातील शाहूपुरी पोलिसांनी अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून पोलिसांनी गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १ किलोहून अधिक गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल पाटील यांना २९ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६:०५ च्या सुमारास एक महत्त्वाची माहिती मिळाली. मार्केट यार्ड परिसरातील एका रोडवर काही तरुण गांजा विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराने दिली होती. या माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली करत मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला आणि संशयित तरुणांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांवर बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. ओंकार रमेश कांबळे (वय २३ वर्षे, रा. आंबेडकर हाउसिंग सोसायटी, पाडळी खुर्द, ता. करवीर) २. पंकज बाबासो पाटील (वय २५ वर्षे, रा. शिवाजी चौक, वडणगे, ता. करवीर) या दोन्ही आरोपींवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४९४/२०२६ नुसार NDPS कायद्यांतर्गत (अमली पदार्थ विरोधी कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपींची झडती आणि कारवाईदरम्यान २१,००० रुपये किमतीचा १ किलो ११८ ग्रॅम वजनाचा ओलासर गांजा, गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 09 CH 7913), आरोपींच्या ताब्यातील सॅमसंग आणि रिअलमी कंपनीचे दोन मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सर, अप्पर पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस निरीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे कोल्हापुरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here