महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध; नांदुरा येथे तहसीलदारांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस

बुलढाणा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन जगदाळे) | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नांदुरा तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नावे एक तीव्र निषेध निवेदन सादर करण्यात आले. आमदार तथा माजी मंत्री सुनेत्राबाई अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह, बेताल व महिलांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या निवेदनाद्वारे तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.

 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु महिलांचा अपमान करणारी, वैयक्तिक पातळीवर टीका करणारी व प्रसिद्धीसाठी बेजबाबदार वक्तव्ये करणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी बाब नाही. महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जातो.

संबंधित व्यक्तीने आपल्या या बेताल वक्तव्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा येत्या काळात राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला.

या निवेदनावर व आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक सुधाकरराव साबे, विधानसभा अध्यक्ष डॉ. श्री. प्रताप एकनाथ हेलगे तसेच शहर अध्यक्ष शेख अनवर शेख हाजी बाबा यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here