शेतकरी विरोधी सरकारच्या धोरणांविरोधात नांदुऱ्यात संभाजी ब्रिगेडचे ‘अर्धनग्न’ आंदोलन

शेतकरी

बुलडाणा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन जगदाळे) |  “महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून शेवटच्या घटका मोजत आहे. कर्ज काढून आणि मोठ्या आशेने लाखो रुपयांचे बी-बियाणे, खते काळ्या मातीत पेरून शेतकरी व शेतमजूर पीक फुलवतात. मात्र, ऐन कापणीच्या वेळी निसर्ग कोपतो आणि त्यातून जे थोडेफार पीक हाताशी येते त्याला सरकार योग्य भाव देत नाही.” यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला असून, सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तहसील कार्यालयासमोर ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात आले.

 

शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे, अशी भूमिका घेत आंदोलकांनी नांदुरा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे पत्र पाठवले आहे. या पत्रात १) संपूर्ण कर्जमाफी: कोणत्याही अटी व शर्तींचे निकष न लावता राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. २) तातडीची मदत: नुकताच आलेला वादळी वारा व अवकाळी पावसामुळे केळी, लिंबू व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी. ३) दिवसा वीज पुरवठा: शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज देण्यात यावी. रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेल्यामुळे कित्येक शेतकरी साप आणि हिंस्त्र पशूंचे बळी ठरले आहेत. दिवसा वीज दिल्यास बळीराजाचा जीव वाचेल. ४) जिगाव धरणाचे काम पूर्ण करा: विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘जिगाव धरणाच्या’ कामाला गती देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. ५) उसाला विमा कवच: नांदुरा तालुक्यात उसाचा पेरा वाढला आहे. गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरांवरील ऊस अक्षरशः भुईसपाट झाला आणि शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे उसाला तात्काळ विमा कवच मिळावे. ६) खते-बियाण्यांची काळाबाजार थांबवा: ऐन पेरणीच्या तोंडावर बियाणे व खतांचा कृत्रिम तुटवडा भासवून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करणाऱ्यांवर कठोर चाप बसवावा. ७) बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई: बोगस बियाणे विक्री करणारी कृषी केंद्रे आणि बनावट बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांना थेट ‘सील’ ठोकण्यात यावे. ८) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार: कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर न सोडता भरीव आर्थिक मदत द्यावी व त्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा या ८ मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

हे आंदोलन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील व शिवश्री निलेश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील व तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे, जिल्हा सचिव मंगेश सोळंके, जिल्हाकार्याध्यक्ष सचिन बाठे, जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर, तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार, विद्यार्थी आघाडी जिलाध्यक्ष पवन सोळंके, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत, ऑटो रिक्षा आघाडी तालुकाध्यक्ष विलास वक्टे, विजय मनस्कार पाटील, रवींद्र वनारे, वैभव वक्टे, तेजराव इंगळे, किशोर इंगळे, देविदास भोपळे, विजय गव्हाणे, ज्ञानेश्वर मापारी, कैलास अहिर, प्रकाश खंडागळे, सुभाष गव्हाणे, बळीराम इंगळे, जानराव इंगळे, देवेंद्र जयस्वाल, हर्षद धांडे, नितीन धांडे, गणेश धांडे, पुरुषोत्तम भापटकर, साहेबराव इंगळे, निंबाजी वानखडे, भरत अवचार, विठ्ठल सारोकार, संतोष वानखडे, बळीराम देवकर, वासुदेव बोदडे, गोपाळ देवकर, अभिषेक सोळंके यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here