पंढरपुरात डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुन्या रोखण्यासाठी पालिकेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

डेंग्यू, हिवताप

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | शहरामध्ये डेंग्यू, हिवताप (मलेरिया) आणि चिकनगुन्या यांसारख्या डासांपासून होणाऱ्या घातक आजारांचा प्रसार रोखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या नागरी हिवताप योजना मलेरिया विभागाने कंबर कसली आहे. हे आजार केवळ शासकीय उपाययोजनांनी नव्हे, तर नागरिकांच्या सक्रिय सहकार्यानेच थांबवणे शक्य असल्याने प्रशासनाने पंढरपूरकरांसाठी विशेष काळजी घेण्याचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

 

डेंग्यू आणि चिकनगुन्या पसरवणारे ‘एडिस इजिप्ती’ हे डास प्रामुख्याने मानवनिर्मित स्वच्छ पाण्यातच पैदास करतात. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेने नागरिकांना खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगितले आहे:

  • पाणी साठा मर्यादित ठेवा: घरामध्ये पाण्याचे साठे ५ दिवसांपेक्षा जास्त काळ उघडे किंवा साठवून ठेवू नका. पाणी भरण्याची भांडी रोजच्या रोज घासून व स्वच्छ धुवूनच पुन्हा भरावीत.
  • घरातील वस्तूंची स्वच्छता: फ्रीजच्या पाठीमागील ट्रे, एअरकुलर, फ्लॉवर पॉट्स, कुंड्या, पाण्याच्या टाक्या आणि भंगार वस्तूंमध्ये ३ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठू देऊ नका. आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ (कोरडा दिवस) म्हणून पाळावा.
  • परिसर स्वच्छता: घराबाहेरील किंवा गच्चीवरील परिसरात असणारी रिकामी शहाळी, फुटके डबे, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने टायर आणि नारळाच्या करवंट्यांची त्वरित विल्हेवाट लावा, जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होणार नाही.
  • टाक्यांना घट्ट झाकणे: गच्चीवरील किंवा जमिनीवरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे नेहमी गच्च लावावीत. पाण्याचे ड्रम आणि टाक्या सुती कापडाने घट्ट बांधून ठेवाव्यात.
  • गप्पी माशांचा वापर: आपल्या घरातील मोठे हौद आणि सिमेंटच्या टाक्यांमध्ये डासांच्या अळ्या खाणाऱ्या गप्पी माशांचा वापर करावा.
  • इतर प्रतिबंधात्मक उपाय: सेप्टिक टँकच्या (शौचालयाच्या विहिरीच्या) व्हेंट पाईपला वरच्या बाजूला बारीक नायलॉनची जाळी बसवावी. तसेच रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.

“लक्षात ठेवा, डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण न झाल्यास डास निर्माण होणार नाहीत व पर्यायाने आजारही पसरणार नाहीत. नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी वरील सर्व सूचनांचे पालन करून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन शुभांगी अधटराव (जीवशास्त्रज्ञ, नागरी हिवताप योजना, पंढरपूर नगरपरिषद), महेश रोकडे (मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद), सचिन इथापे (प्रशासक, पंढरपूर नगरपरिषद) यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here