बुलडाणा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन जगदाळे) | नांदुरा नगर परिषदेचे धडाडीचे नगरसेवक मोहम्मद फुरकान यांच्या जनसेवा आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना ‘Emerging Achievers Award Council’ तर्फे सोशल वर्क (सामाजिक कार्य) आणि पॉलिटिक्स (राजकारण) या क्षेत्रातील मानाची ‘मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली आहे. या सर्वोच्च बहुमानामुळे मोहम्मद फुरकान यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘Emerging Achievers Award Council’ ही सामाजिक कार्य, नेतृत्व आणि जनकल्याण या क्षेत्रांत उल्लेखनीय व मार्गदर्शक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारी एक प्रतिष्ठित आणि केंद्र सरकार संलग्न (Central Government-affiliated) संस्था आहे. मोहम्मद फुरकान यांनी एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून केलेली जनहिताची कामे, सामाजिक बांधिलकी आणि अविरत घेतलेले कष्ट लक्षात घेऊन संस्थेने त्यांची या विशेष सन्मानासाठी निवड केली.
या अभूतपूर्व सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नगरसेवक मोहम्मद फुरकान यांनी सांगितले की, “हा क्षण माझ्या जीवनातील अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. या सन्मानामुळे भविष्यात समाजसेवा, युवकांचे सक्षमीकरण आणि नागरिकांच्या हितासाठी अधिक जोमाने व ताकदीने काम करण्याची नवी प्रेरणा मला मिळाली आहे.”
हा गौरव केवळ माझा नसून, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या सर्वांचा आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मोहम्मद फुरकान यांनी हा सन्मान नांदुरा शहरातील तमाम नागरिक, समर्थक, शुभेच्छुक आणि त्यांच्या समाजकार्यावर निरंतर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अत्यंत नम्रपणे समर्पित केला आहे. मोहम्मद फुरकान यांना मिळालेली ही मानद डॉक्टरेट नांदुरा शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.







