नाशिक (उपसंपादक चांगदेव पवार) | नाशिक शहरात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलींविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम राबवत एक मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व विशेष भरारी पथकांच्या संयुक्त कारवाईत ३८ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेत पोलिसांनी वाहनांसह सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शासकीय निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने विशेष पावले उचलली आहेत. या मोहिमेचे सनियंत्रण करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) समाधान हिरे यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध संवेदनशील आणि मुख्य भागांमध्ये १४ विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली होती. या प्रत्येक भरारी पथकात एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून १० लाख ७९ हजार रुपये किमतीच्या ३८ गोवंश जनावरांची सुटका केली. यामध्ये १९ गायी, ८ बैल आणि ११ गोऱ्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ स्थानिक गोशाळेत हलविण्यात आले आहे. याशिवाय कारवाईदरम्यान अंदाजे १०० किलो कातडीसह मांस देखील जप्त करण्यात आले आहे.
अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे ११ लाख रुपये किमतीची वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, साठवणूक आणि कत्तलीविरोधातील ही धडक मोहीम अशीच पुढेही सुरू राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे.







