मुंबई (सहसंपादक नामदेव पाटील) | ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत एका अनोळखी तरुणाच्या खुनाचा गूढ गुन्हा अवघ्या ४८ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. उधारीच्या पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शमशाद अली वारीश अली (वय ३५, रा. काजूपाडा, कुर्ला पश्चिम, मुंबई) असे मयत तरुणाचे नाव आहे.
दिनांक २७ मे २०२६ रोजी वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहागाव येथील एका मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या शेतात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हात, पाय आणि डोळे बांधलेले होते, तसेच अंगावर धारदार हत्याराने ठिकठिकाणी वार केलेले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे मोठे आव्हान होते. याप्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. विनयकुमार राठोड यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप गिते यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि शेजारील जिल्ह्यांमधील मिसिंग (हरवलेल्या) व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मयताच्या अंगावरील कपडे आणि चप्पल यावरून अखेर त्याची ओळख पटली. तो साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेला शमशाद अली वारीश अली असल्याचे समोर आले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयावरून सय्यद हसन सय्यद मेहबुब बादशहा (वय ३८, रा. मुंब्रा, ठाणे) आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर (वय ४३, रा. माहिम, मुंबई) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता खुनाचा थरार उघडकीस आला.
मयत शमशाद याने आरोपी क्र. १ सय्यद हसन याला काही पैसे उसने दिले होते. सय्यद हे पैसे परत करत नसल्याने शमशाद त्याच्याकडे सतत पैशांचा तगादा लावत होता. याचा राग मनात धरून सय्यद हसन याने त्याचा मित्र समीर कल्याणकर याच्या मदतीने शमशाद याला दहागाव (वाशिंद) येथे फूस लावून आणले. तिथे त्याचे हात, पाय आणि डोळे बांधून धारदार हत्याराने त्याचा निर्घृण खून केला आणि मृतदेह शेतात फेकून दिला.
कोणतेही धागेदोरे नसताना केवळ ४८ तासांत हा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गिते, पोउनि महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास वाशिंद पोलीस ठाण्याचे सपोनि गोविंद पाटील करत आहेत.







