अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई : ३ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांसह काश्मीरमधील दोघांसह तिघांना अटक

अंमली पदार्थ

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी अंमली पदार्थांच्या विरोधात पुकारलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचून तब्बल ३ कोटी ३ लाख ६४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३ किलो २० ग्रॅम अंमली पदार्थ ‘चरस’ आणि ‘ट्रामाडॉल’ (Tramadol) च्या १२ हजार ९८४ कॅप्सुल्सचा समावेश आहे. याप्रकरणी यापूर्वी दोनदा शिक्षा भोगलेल्या एका मुख्य आरोपीसह जम्मू-काश्मीरमधील दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना दिली. वरिष्ठांच्या परवानगीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड, राजेंद्र निकम व पथकाने खारेगाव टोलनाका परिसरात सापळा रचला.

दिनांक ०८ मे २०२६ रोजी रात्री २१:५० वाजण्याच्या सुमारास संशयास्पद रित्या फिरत असलेला आरोपी फिरोज अब्दुल खान (वय ५२ वर्षे, रा. अंकलेश्वर, जि. भरूच, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३ कोटी २ लाख रुपये किमतीचा ३ किलो २० ग्रॅम चरस आणि १ लाख ४८ हजार ५०४ रुपये किमतीच्या १२,९८४ ‘स्पॅस्मो-प्रॉक्सिव्हन आर-प्लस’ (Tramadol) कॅप्सुल्स बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगल्याचे आढळून आले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा (रजि. नं. २५५/२०२६) नोंदवण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या तस्करांचे ‘बॅकवर्ड नेटवर्क’ (तस्करीचे मूळ स्त्रोत) शोधून काढले. कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी मोहमद अशरफ गुलाम अहमद शेदा (वय ४२, रा. शमशीपुरा, जि. अनंतनाग, जम्मू-काश्मीर) याला १९ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली. यानंतर पथकाने जम्मू-काश्मीरमधील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कुपवाडा जिल्ह्यातून मुख्य पुरवठादार आरोपी शौकत अजीज भीर उर्फ जुबेर (रा. देवर लोलाब, जि. कुपवाडा, जम्मू-काश्मीर) याला ६ जून २०२६ रोजी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.

काश्मीरमधून अटक केलेल्या आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर ठाण्यात आणण्यात आले असून, न्यायालयाने त्याला १२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच मुख्य आरोपी फिरोज खान याचीही पुन्हा पोलीस कस्टडी घेऊन चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला फिरोज अब्दुल खान हा आंतरराज्य टोळीतील सराईत तस्कर असून त्याने यापूर्वी एन.सी.बी.च्या (NCB) गुन्ह्यांमध्ये दोनदा शिक्षा भोगली आहे: १) एन.सी.बी. हिम्मतनगर, अहमदाबाद (गु.र.कं. ०३/२००८) २) एन.सी.बी. जम्मू (गु.र.कं. ०९/२०१७) हा चरसचा साठा थेट जम्मू-काश्मीरमधून महाराष्ट्रात आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तस्करांनी काश्मीर ते ठाणे असा एवढा मोठा साठा कसा आणला आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील करत आहेत.

सदरची धडक कारवाई सह पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि सोमनाथ कर्णवर-पाटील, पोउपनि दीपक डुम्मलवाड, राजेंद्र निकम, मोहन परब, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार अमोल देसाई, संदीप चव्हाण, हरीष तावडे, अमोल पवार, नंदकिशोर सोनगिरे, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सकपाळ, अभिजीत मोरे, गिरीष पाटील, आबाजी चव्हाण, अनुप राक्षे, शिल्पा कसबे आणि कोमल लादे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here