नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (दि. ९ जून) एका तरुण शेतकऱ्याचा अजब आणि धक्कादायक प्रताप समोर आला आहे. कांदा लिलावासाठी आणलेल्या ट्रॅक्टरच्या दोन्ही मोठ्या टायरमध्ये पाणी भरून वजन वाढवण्याचा आणि व्यापाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ९ क्विंटल कांदा आणून चक्क १३ क्विंटलचे पैसे लाटण्याचा या शेतकऱ्याचा प्रयत्न व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे फसला असून, या प्रकारामुळे बाजार समितीच्या आवारात काही काळ तीव्र खळबळ उडाली होती.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सटाणा शहरालगतच्या ताहराबाद रस्त्यावरील एका तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपला कांदा लिलावासाठी ट्रॅक्टरमधून आणला होता. ‘कृष्णा आडत’ यांच्या वतीने ट्रॅक्टरचे वजन केले असता ते १३.२५ क्विंटल आले. मात्र, कांदा रिकामा केल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास जेव्हा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचे पुन्हा वजन करण्यात आले, तेव्हा वजनामध्ये मोठा फरक जाणवल्याने व्यापाऱ्याला संशय आला.
व्यापाऱ्याने प्रत्यक्ष गोण्या मोजून कांद्याचे वजन केले असता, तिथे केवळ ९ क्विंटल कांदा भरला. वजनात तब्बल ४ क्विंटलची (४०० किलो) घट आल्याचे उघड होताच व्यापाऱ्याने तात्काळ बाजार समिती प्रशासनाकडे धाव घेतली.
“अशा कृत्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रतिमेला तडा जातो. भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत म्हणून शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या सर्वच घटकांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. तालुक्यातील शेतकरी बांधवांना योग्य भाव देण्यासह व्यापारी व शेतकऱ्यांमधील परस्पर समन्वयासाठी आमचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे.”
— राहुल केदा सोनवणे (संचालक, सटाणा कृउबा)
बाजार समिती प्रशासनाने प्रकरणाची खात्री करण्यासाठी प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. त्यात संबंधित चाणाक्ष शेतकऱ्याने बाजार समितीत येताना आणि जाताना वेगवेगळ्या गेटचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील टायर दुकानदारांकडे चौकशी केली.
तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली की, संबंधित शेतकऱ्याने बाजार समितीत येण्यापूर्वी मालेगाव रोडवरील एका पंक्चरच्या दुकानात जाऊन ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरमध्ये ४०० लिटर पाणी भरले होते आणि कांदा रिकामा केल्यानंतर दुसऱ्या फेरीत ते पाणी काढून टायर रिकामे केले होते. या भक्कम पुराव्याआधारे बाजार समितीने शेतकऱ्याला बोलावून जाब विचारला. सुरुवातीला नकार देणाऱ्या शेतकऱ्याने पोलीस कारवाईच्या भीतीने अखेर आपली चूक कबूल केली.
“सध्या बाजार समित्यांमध्ये कांदा चोरी, डिझेल आणि बॅटरी चोरीच्या घटना घडत असताना, थेट ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अवघ्या ४ ते ५ हजार रुपयांच्या अल्पशा लाभासाठी अशा प्रकारची बनवेगिरी केल्यास २४ तास काबाडकष्ट करणाऱ्या तमाम प्रामाणिक बळीराजाची प्रतिमा मलिन होते. विनाकारण शेतकरी, व्यापारी आणि प्रशासनात अविश्वास निर्माण होतो. भविष्यात कोणत्याही तरुण शेतकऱ्याने असे पाऊल उचलू नये.”
— कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना)
या संपूर्ण वादामुळे बुधवारी सकाळी बाजार समितीमधील कांदा लिलाव तब्बल एक तास उशिराने सुरू झाला. व्यापारी वर्गात या प्रकारामुळे तीव्र नाराजी होती. अखेर माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, कृउबा संचालक राहुल केदा सोनवणे, काळू जाधव, दीपक रौंदळ, योगेश रौंदळ, दीपक सोनवणे आणि कृउबा सचिव भास्कर तांबे यांनी मध्यस्थी करत व्यापारी आणि शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली.
या दिवशी सटाणा बाजार समितीत एकूण १६ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून संबंधित शेतकऱ्याच्या कांद्याला ११२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असल्याचे संचालक राहुल सोनवणे यांनी स्पष्ट केले.








