नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | शेतकरी संघटनेचे पंचप्राण, स्वर्गीय शरद जोशी यांची सुंदर आणि आकर्षक मूर्ती डोक्यावर घेऊन विदर्भातील एका निष्ठावंत कार्यकर्त्याने थेट पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आणत एक आगळावेगळा उपक्रम केला आहे. १६ नोव्हेंबर १९८३ रोजी कार्तिकी वारीच्या निमित्ताने स्वर्गीय शरद जोशी यांनी पंढरपुरात लाखो शेतकऱ्यांचा विशाल मेळावा घेतला होता. याच ऐतिहासिक मेळाव्यात त्यांनी विठ्ठलाला साकडे घाालत शेतकऱ्यांना “भीक नको, घामाचे दाम हवे” हा हक्काचा विचार दिला होता.
स्वर्गीय शरद जोशी यांच्या याच विचारांना आणि शेतकरी चळवळीच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा देण्यासाठी, शेतकरी संघटनेचे पाईक श्री. लिंबाजी डोईफोडे (रा. राहेरी खुर्द, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांनी शरद जोशी यांची सुरेख मूर्ती आपल्या डोक्यावर घेऊन राहेरी ते देहू आणि देहू ते पंढरपूर असा शेकडो किलोमीटरचा खडतर पायी प्रवास केला. या प्रेरणादायी प्रवासात त्यांच्यासोबत एकनाथ काकड, सानप मामा, घोंगे मामा आणि शिवहरी नागरे हे वारकरीही सहभागी झाले होते.
शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा, या एकमेव अपेक्षेने शरद जोशी यांनी आपल्या लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली आणि संपूर्ण आयुष्य शेतकरी चळवळीसाठी व शेतकरी कल्याणासाठी अर्पण केले. त्यांच्या याच विचारांची शिदोरी आणि शेतकरी स्वाभिमानाचा जागर पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी लिंबाजी डोईफोडे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत.
पंढरपुरात आगमन झाल्यानंतर चंद्रभागा नदीतीरी स्वर्गीय शरद जोशी यांच्या मूर्तीचे स्नान व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पंढरपूर शहरात नगरप्रदक्षिणा करून विठ्ठलाच्या भेटीसाठी ही मूर्ती पंढरीत नेण्यात आली.
या अनोख्या भेटीदरम्यान पंढरपुरात शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष तथा जनकल्याण मराठी पत्रकार संचलित बळीराजा हक्क समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री. माणिकराव निकम, सुखदेव खैरनार, रामदास निकम, प्रवीण निकम, जिभाऊ कोकरे, देवबा सोनवणे, भास्कर निकम, मधुकर निकम, दिगंबर निकम आदींनी या दिंडीचे व कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या शरद जोशी यांच्या विचारांना अभिवादन करणारा हा अनोखा उपक्रम शेतकरी चळवळीत चर्चेचा विषय ठरला असून, मूर्ती डोक्यावर घेऊन शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या लिंबाजी डोईफोडे यांच्या निष्ठेचे आणि धाडसाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.







