नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी ज्येष्ठ पत्रकार विनायक इनामदार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समिती व बळीराजा हक्क समितीच्या राज्य समन्वयक पदाचीही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोषभाऊ जाधव यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
यापूर्वी विनायक इनामदार यांनी पत्रकार संघात ‘उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष’ म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव, सामाजिक कार्य तसेच संघटनावरील पकड आणि उल्लेखनीय नेतृत्वाची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष संतोषभाऊ जाधव आणि राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्यातील पत्रकार, पोलीस मित्र आणि शेतकरी वर्गाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील व संघ अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विनायक इनामदार यांनी विविध नामवंत दैनिकांमध्ये पत्रकारिता करून आपल्या प्रभावी लेखनाचा आणि कार्याचा मोठा ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रामुख्याने रस्ते व वाहतूक सुरक्षा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियान, ग्राहक हित व ग्राहक हक्क संरक्षण, शेतकऱ्यांचे व कामगारांचे प्रश्न या लोकहिताच्या विषयांवर सातत्याने आवाज उठवला आहे:
त्यांच्या या निस्वार्थी सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. विनायक इनामदार यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.







