जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर व प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमितकुमार बागुल व त्यांच्या पथकाने अवैध गुटखा तस्करीवर मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या इनोव्हा कारसह एकूण ५,१७,८६८/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. अमितकुमार बागुल हे अवैध धंद्यांबाबत गोपनीय माहिती संकलित करत होते. दरम्यान, २४ जुलै २०२६ रोजी त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नॅशनल हायवे क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर ते भुसावळ जाणाऱ्या वाहिनीवर, कपील वस्तीजवळ काही व्यक्ती महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याची अवैधरित्या वाहतूक करत आहेत.
माहितीची खातरजमा करून प्रभारी अधिकारी श्री. बागुल यांनी आपल्या पथकासह अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८ वर्षे, रा. खालची आळी, नशिराबाद, जि. जळगाव) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या ताब्यातील सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारची (क्रमांक MH-20 BD-3000) तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला. घटनास्थळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्यात आला.
अन्न प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि इनोव्हा कार असा एकूण ५,१७,८६८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. नागरिकांनी अशा अवैध व्यवसायास प्रोत्साहन देऊ नये. परिसरात अशी बेकायदेशीर तस्करी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनिय ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (परिमंडळ, जळगाव) संदीप गावीत, आणि मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली; वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी, तसेच पोलीस अंमलदार भूषण माळी, सुखराम सावकारे, उमेश बारी, परशुराम गुमलकर, इकबाल शहा, शफीक अली, गोपीचंद सोनवणे, प्रशांत ठाकुर, मनोहर बनसोडे आणि विजय बाविस्कर यांच्या पथकाने पार पाडली







