सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावकरांचा पाठिंबा; केंद्र शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोनम वांगचुक

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षार्थ दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावकर जागृत नागरिकांच्या वतीने नैतिक पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

या निवेदनात लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आपले मत मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलनदरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक संवाद साधून योग्य तो निर्णय घ्यावा.

विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण या राष्ट्र महत्त्वाच्या विषयांवर सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करून ठोस धोरण जाहीर करावे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हाताळण्यात झालेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही जनभावना केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यात यावी. विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या लोकशाही पद्धतीने व्यक्त होणाऱ्या भावना व मागण्यांचा सन्मान करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत.

जळगाव जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून या निवेदनातील भावना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारपर्यंत तातडीने पोहोचवाव्यात व विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य ती शिफारस करावी, अशी विनंती जळगावकर जागृत नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर गजानन मालपुरे, ॲड. जमील देशपांडे, अशोक लाडवंजारी, जमील शेख, गिरिश लाडवंजारी, प्रा. डॉ. विनोद हिम्मतराव गायकवाड, अनंत परिहार, मनोज विठ्ठलराव पवार, सुनील दमायेय माळी, मनोज नारायण वाणी, प्रतिक्षा विजय सोनवणे, मिराबाई, अरूणाताई यांच्यासह अनेक जागृत नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here