शिक्षक प्रकाश बिरारी यांच्या सेवापूर्तीनिमित्त ‘ग्राम समृद्धी’ विशेष अंकाचे प्रकाशन

शिक्षक प्रकाश बिरारी

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : ज्या कंधाणे गावाने आपल्याला ओळख दिली, त्या गावाची आणि तिथल्या मातीची रूढी-परंपरांची माहिती शब्दशः कोरून ठेवण्याचा नियोजनबद्ध उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गावाचा इतिहास नव्या पिढीला समजण्यासाठी कंधाणे गावाचे भूमिपुत्र तथा दीर्घेष्ठ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेले प्राथमिक शिक्षक प्रकाश बिरारी यांच्या सेवापूर्तीनिमित्त नंदनवन लॉन्स, सटाणा येथे ‘ग्राम समृद्धी’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अभय सुपेकर उपस्थित होते.

 

प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार अभय सुपेकर म्हणाले की, हा विशेष अंक महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दस्ताऐवजीकरणाचाच एक भाग आहे. हे केवळ सरकारी आकडेवारीतील दस्तऐवजीकरण नसून गावाची ओळख नोंदवून ठेवणारा ऐतिहासिक प्रकल्प आहे. गावाची सर्वंकष माहिती नोंदवणे आणि माहिती तंत्रज्ञानातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) नावाच्या द्रुतगती महामार्गाशी गावाचा रस्ता जोडणे, असे या प्रकल्पाचे भवितव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटाण्याच्या नगराध्यक्ष सौ. हर्षदा पाटील या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणचे प्रांताधिकारी महेश शेलार, बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, पोलीस निरीक्षक योगेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीमती चित्रा देवरे, वसाकाचे माजी उपाध्यक्ष फुला आप्पा जाधव, ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन समारंभानंतर सेवानिवृत्तीनिमित्त श्री. प्रकाश बिरारी यांचा कंधाणे ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, प्राचार्य अनिल पाटील, भास्कर बिरारी, सेवानिवृत्त प्रा. डॉ. वसंतराव बिरारी, चिरंजीव निखिल बिरारी आणि विश्वास चंद्रात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी फुला आप्पा जाधव, नारायण गांगुर्डे, आणासाहेब बिरारी, विजय कोकाटे, अविनाश साबरे, ‘कोर्टेवा एग्री सायन्स’चे प्रतिनिधी अमोल आव्हाड, व्यवस्थापक लक्ष्मण अंबोरे, साहेबराव सोनवणे, रमेश दादा देवरे, प्रा. डॉ. अभिमन बिरारी, डॉ. दौलतराव गांगुर्डे, डॉ. संभाजी अहिरे, बाजार समितीचे माजी सभापती संजय बिरारी, संचालक प्रमोद बिरारी, मोहन सूर्यवंशी यांच्यासह कंधाणे व परिसरातील शेकडो ग्रामस्थ व आप्तेष्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शिक्षक संजय भामरे यांनी केले, तर आभार अंबादास देवरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here