देवळा बाजार समितीच्या आवारात शेतकरी नेते कै. शरद जोशी यांचे स्मारक उभारावे; शेतकरी संघटनांची आक्रमक मागणी

शरद जोशी

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | मागील ४० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व गावागावातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे, जगाचे लक्ष वेधून घेणारे शेतकरी संघटनेचे प्रणेते तथा शेतकऱ्यांचे प्राण कै. शरद जोशी यांचा पुतळा किंवा भव्य स्मारक देवळा तालुक्यात उभी राहावे, अशी जोरदार मागणी देवळा तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासाठी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा अत्यंत योग्य असून, बाजार समितीने यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 कै. शरद जोशी यांनी उभी केलेली लढाऊ चळवळ आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेले महान कार्य येणाऱ्या भावी पिढीला कायम प्रेरणादायी ठरावे, यासाठी नवीन बाजार समितीच्या आवारातील शेतकरी निवासाजवळ योग्य जागा निश्चित करून, त्या ठिकाणी सुंदर व आकर्षक पुतळा किंवा स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली आहे.

या मागणी संदर्भात बाजार समितीच्या संचालक मंडळ, सर्व सभासद तसेच मा. सभापती आणि उपसभापती यांना विनंती करण्यात आली असून, होवू घातलेल्या आगामी सर्वसाधारण सभेत याविषयीचा योग्य तो ठराव मंजूर करण्यात यावा. तसेच स्मारकाच्या कामासाठी शेतकऱ्यांचीही सर्वतोपरी मदत घेण्यात यावी, जेणेकरून हे काम वेळेत पूर्ण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबतचे निवेदन बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच सचिव यांना सुपूर्द करण्यात आले असून, या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव आणि देवळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.शरद जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here