स्पा मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या जुगार अडड्यावर बार्शी पोलिसांचा छापा; १२ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त, १० आरोपी अटकेत

sex racket
File Photo

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बार्शी तालुका पोलिसांनी एक मोठी कामगिरी बजावली असून, बार्शी ते लातूर जाणाऱ्या बायपास रोडवरील एका नामांकित स्पा मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या जुगार अडड्याचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील जुगार, मटका, गुटखा, हातभट्टी आणि बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते.

दिनांक १० जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून एक खात्रीशीर माहिती मिळाली. बार्शी ते लातूर जाणाऱ्या बायपास रोडवर, मौजे नागोबाचीवाडी (ता. बार्शी) च्या हद्दीत असलेल्या ‘लक्झरी डिलक्स स्पा मसाज सेंटर’ मध्ये काही इसम स्पाच्या आडून जुगाराचा अड्डा चालवत आहेत, अशी ती माहिती होती.

माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांच्या विशेष पथकाने रात्रीच्या सुमारास सदर स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान १० इसम पैशाची पैज लावून ‘तीरट’ नावाचा जुगार खेळत असताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी तात्काळ या १० आरोपींना ताब्यात घेतले.

घटनास्थळाची झडती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि आरोपींची वाहने मिळून आली. पोलिसांनी या कारवाईत एकूण १२ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सदरचा जुगार अड्डा हा आकाश काशिद (जुगार अड्डा चालक) आणि स्पा सेंटरचा मॅनेजर बाबु चौधरी हे दोघे मिळून चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी स्पा मालक, मॅनेजर आणि जुगार खेळणाऱ्या इतर इसमांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बार्शी तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोहेकॉ/१७५ सोमनाथ खांडेकर, पोकों/१०२७ सुरेश बिरकले, पोकों/१९८० महंमदगौस मेहेदी आणि चापोकों/१६ लक्ष्मण चिट्टलवाड यांच्या पथकाने बजावली आहे. या धडक कारवाईमुळे बार्शी परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here