जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | भुसावळ तालुक्यातील तप्त कठोरा येथे पिंप्रीसेकम शेती शिवार रस्त्यावर एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. मुरूम टाकून मागे (रिव्हर्स) घेणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, डंपरखाली दाबले जाऊन ५५ वर्षीय आजोबांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून त्यांची चार वर्षांची निष्पाप नात सुदैवाने बालंबाल बचवली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी संबंधित डंपरला आग लावून जागेवरच पेटवून दिले.
याबाबत मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, तप्त कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (वय ५५ वर्षे) हे आपल्या ‘परी’ नावाच्या चार वर्षांच्या नातीला सोबत घेऊन पिंप्रीसेकम रस्त्यावरील शेतात गेले होते. सकाळी शेतातून काम आटपून ते आपल्या ‘एमएच १९ बीएक्स ९३२०’ क्रमांकाच्या मोटरसायकलने घराकडे परतत होते.
त्याच वेळी शेती शिवाराच्या अरुंद रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी आलेले ‘एमएच १९ ईयू ३७३७’ क्रमांकाचे डंपर मागे (रिव्हर्स) घेत होते. रस्ता अरुंद असल्याने डंपरचालकाला अंदाज आला नाही आणि त्याने आनंदा पाटील यांच्या दुचाकीला मागच्या बाजूने जबर धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीसह आनंदा पाटील हे डंपरच्या अवाढव्य चाकांखाली दाबले गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यासोबत असलेली चिमुरडी नात परी ही बाजूला फेकली गेल्याने या मोठ्या अपघातातून सुदैवाने सुखरूप राहिली.
अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. चवताळलेल्या नागरिकांनी डंपरखाली दबलेली दुचाकी आणि आनंदा पाटील यांना बाहेर काढून तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
आजोबांच्या निधनाची बातमी कळताच नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी घटनास्थळी उभे असलेले डंपर थेट पेटवून दिले. डंपरने पेट घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी डंपरला लागलेली आग आटोक्यात आणली.
अपघाताची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे तप्त कठोरा गावावर आणि परिसरात शोककळा पसरली असून अरुंद रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







