पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून रोटवद नांदेड शेतरस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर; माजी जि. प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी

पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला ‘रोटवद ते नादेड’ शेतरस्ता प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे. सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या या अत्यंत गरजेच्या शेतरस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

या रस्त्याच्या सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील यांनी नुकतीच या परिसराला भेट दिली. त्यांनी रस्ते कामाचा दर्जा आणि गतीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यावेळी रोटवद व नादेड येथील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्त्याच्या कामाबाबत अत्यंत समाधान व्यक्त केले. तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा रस्ता मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

या शेतरस्त्या अभावी गेल्या अनेक वर्षांपासून रोटवद आणि नादेड परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात व इतर वेळी शेतात ये-जा करताना आणि शेतीमालाची वाहतूक करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. “हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे आता थेट शेताच्या बांधावरून शेतीमालाची वाहतूक करणे अधिक सोयीचे, सुरक्षित आणि जलद होणार असून, परिसरातील संपूर्ण दळणवळण व्यवस्थेला याचा मोठा फायदा होईल,” अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि दोन्ही गावांतील शेतकरी-ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याचे जे काही किरकोळ उर्वरित काम शिल्लक आहे, ते देखील येत्या काही दिवसांत गतीने पूर्ण होऊन हा संपूर्ण मार्ग शेतकऱ्यांच्या सेवेत अधिकृतपणे उपलब्ध होईल, अशी अपेक्षा यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here