सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | तासगाव येथील बहुचर्चित मयत ओंकार उर्फ रोहित फाळके याच्या निर्घृण खून प्रकरणातील गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या एका मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना अखेर यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरामध्ये अत्यंत गुप्तता पाळून लावलेल्या सापळ्यात हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे या गाजलेल्या खून प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस स्टेशनमधील नोंदीनुसार, दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी मौजे वायफळे (ता. तासगाव) येथे पूर्ववैमनस्य आणि न्यायालयात सुरू असलेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी विशाल फाळके व त्याच्या साथीदारांनी मयत ओंकार उर्फ रोहित फाळके याच्यावर कोयते आणि तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. तसेच त्याला वाचवण्यासाठी आलेले फिर्यादी संजय दामु फाळके (वय ५५ वर्षे), त्यांची पत्नी जयश्री फाळके, आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शेख यांच्यावरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५५९/२०२४, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१), १८App(२), १९१(२), १९१(३), १९०, ६१(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५, २७ अन्वये गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी यापूर्वीच १) विशाल सज्जण फाळके, २) अनिकेत संतोष खुळे, ३) आकाश महिपती मळेकर, ४) गणेश प्रकाश मळेकर, ५) विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड, ६) हर्षल संतोष चव्हाण, ७) संदेश अरुण नायर यांच्यासह ८) एका बालअपराध्याला अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी यश रमेश ढेबे हा गुन्हा घडल्यापासूनच फरार होता.
सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले.
या पथकातील पोलीस अंमलदार अमोल चव्हाण यांना तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की, फरार आरोपी हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘पळू’ या गावी नाव बदलून व वेषांतर करून राहत आहे. माहिती मिळताच तासगाव पोलिसांचे विशेष पथक तात्काळ ठाणे जिल्ह्याकडे रवाना झाले. पथकाने अत्यंत कौशल्याने नियोजन करून सापळा रचला आणि ११ जून २०२६ रोजी पहाटे ०२.०३ वाजता यश रमेश ढेबे (वय २३ वर्षे, रा. कात्रज गाव, गणपती मंदिराजवळ, कात्रज, पुणे) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (तासगाव विभाग) श्री. सचिन थोरबोले स्वतः करत आहेत. अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक ठरलेल्या या खुनाच्या गुन्ह्यातील शेवटच्या फरार आरोपीला दीड वर्षांनंतर शोधून काढल्याबद्दल तासगाव पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष अभिनंदन केले जात आहे.
पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बदने, पो.हवा. अमोल चव्हाण, पो.हवा. अभिजित गायकवाड, पो.हवा. सुभास खुबीकर, पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव, सागर पाटील तसेच सायबर पथकातील पो.उपनिरीक्षक बोबडे, पो.कॉ. अजय पाटील, पो.हवा. इम्रान महालकरी आणि म.पो.शि. रेखा कोळी यांनी या यशस्वी कामगिरीत सहभाग घेतला.







