पक्ष जनसामान्यांचा, आवाज महाराष्ट्राचा: जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | “पक्ष जनसामान्यांचा, आवाज महाराष्ट्राचा” हा बाणा जपत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचा २७ वा वर्धापन दिन जळगाव जिल्हा कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात पक्षाचे अधिकृत ध्वजारोहण करून कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचा नवा संकल्प सोडला.

 

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय दिमाखात झाली. जळगाव शहर महानगर अध्यक्ष ईजाजभाई मलिक यांच्या शुभहस्ते पक्षाचे अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पक्ष ध्वजस्तंभाचे पूजन माजी महानगर अध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आले, तर जिल्हा समन्वयक विकासदादा पवार यांनी श्रीफळ वाढवून वंदन केले.

या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारसरणीची आठवण यावेळी जागवण्यात आली.

पवार साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत घेतलेले ऐतिहासिक निर्णय; जसे की महिलांना दिलेले ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा केलेला नामविस्तार, शेतकऱ्यांना दिलेली ऐतिहासिक कर्जमाफी आणि युवकांच्या रोजगारासाठी आयटी (IT) क्षेत्राची पायाभरणी, या सर्व महत्त्वपूर्ण कामांचा गौरव करण्यात आला. साहेबांचे हे विचार आणि कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची शपथ यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतली.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षात निष्ठावंतपणे कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत केक कापून २७ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन व नियोजन श्री. वाय. एस. महाजन सर यांनी केले.

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने सौ. मंगलाताई पाटील, एस. डी. पाटील, महाडिक सर, विलास भाऊसाहेब पाटील, राजेश गोयल, जयप्रकाश चांगरे, डी. एम. पाटील सर, रिंकू चौधरी, विनायक पाटील, सुनील भैय्या माळी, गौरव पाटील, रमेश पाटील, गिरीश सांगळे आणि अकील पटेल यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

पक्ष संघटना अधिक बळकट करून येणाऱ्या काळात शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी अधिक तीव्रतेने संघर्ष करण्याची ऊर्जा या वर्धापन दिनाने दिली, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार श्री. वाय. एस. महाजन सर यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here